Saturday, April 8, 2017

माझी नवीन खंड कविता
👇🏻
एकदा एक उत्स्फूर्त वाक्य कानावर माझ्या आलं
"आज-काल लाजाळूचं झाडच दिसून नाही राहिलं"
एकदम माझं लहानपणच माझ्या डोळ्यासमोर येऊन गेलं
अरेरे!, खरंच लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

काय करेल लाजाळू तरी बिचारी लाजयचं का हेच तिला न कळालं
 लाज नक्की सोडलीय तरी कुठं हेच तिला ना उमगलं
खरंच आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

मग मीच तिला आता भेटून विचारायचं ठरवलं
तिच्या रागाचं कारण नक्की काय हे मी हेरलं
"माणसानं निसर्गाशी नातं का तोडलं?",
हे तिचं म्हणणं तिला शोधताना मला जाणवलं
आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं...

शेवटी बोलायला तयार नसताना तिनं एकदम मला म्हटलं,
" सांग तूच बरं तूच मला माणसांकडे मन कुठं राहिलं?
खरं सांगतो आज पहिल्यांदा मी लाजाळूला चिडताना पाहिलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं..

"सांग तूच आता मला माणसाकडं मन कुठं राहिलं ?"
लाजायचं सोड; माणसानं लाजेलाच खेळणं करून ठेवलं !
आज खरंच मी लाजाळूला रागाने लाल झालेलं पाहिलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

"अरे , माणसाने सगळीकडेच लाजेला दावणीला बांधलं...
लाजण्यासाठी त्यानं मला कोणतं कारणच ना ठेवलं...
अरे माणसाने मला आज लपायला भाग पाडलं !
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

खोट्या माणुसकीचं ओझं त्यानं नेहमी वाहिलं
बुद्धिबळाच्या कुजक्या डावात त्यानं मला हरवलं
आज त्यानं मला लपायला पुन्हा भाग पडलं
आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं...

हां, अजूनही थोडी फार लाज आहे शिल्लक म्हटलं
जिथं जिथं ती आहे तिथं मी उगवायचं ठरवलं
पण; आज मात्र माणसानं लाजायचं बंद केलं
आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं..

अपेक्षांच्या ओझ्यात मुलांचं अंगण त्यांनी बंद केलं
छोट्यांनी हात लावायचा अन् मी लाजायचं हे आमचं नातं त्यांनी तोडलं
मगं,मी पण लाजायचं बंद करून टाकलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

अरे, लहान मुलांचं अन माझं नातं किती छान जमायचं
त्यांनी मला हात लावायचा आणि मी लाजायचं
लाज अशीच असते ~हा~हे मी शिकवायचं
पण आज काल मुलांचं मनही कृत्रिमतेतंच अडकलं
म्हणून मी पण आता लपायचं ठरवलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

लाजाळूच्या डोळ्यात आता मात्र पाणी वाहायला लागलं
तिला कसं समजावायचं हे मलाच न उमगलं
म्हंटलं तिला मी, "लाजत जा त्यांच्यासाठी ज्यांनी तुला जपलं "
तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवत मीच तिला म्हंटलं
आणि हसऱ्या लाजाळूला मी पुन्हा एकदा तिच्या रुपात पाहिलं
पण आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं...

मी सांगू का तुम्हाला, लाजाळूचं म्हणणं खरंच नाही चुकलं
आज काल लाजाळूचं मन जपणारं कोणीच नाही राहिलं
    आज काल लाजाळूचं झाडच नाही राहीलं..
        आज काल लाजाळूचं झाडच नाही राहीलं....

लाजाळू
भाग -1

©अमित संजय कुलकर्णी
गडहिंग्लज.
9404968084

Wednesday, December 28, 2016

ध्येय

मी चालत राहतो माझ्या ध्येयावर
आणि, चिंता सोडून देतो वाऱ्यावर

मला माहिती असतं की,
येणारच माझ्या वाटेत अडथळे
इथे अडथळे करणाऱ्यांचेच तर जमलेत मेळे

तरीही मला चालायचंच  आहे
ध्येय मला माझं गाठायचं आहे

कधी कधी खड्डे लागतीलही वाटेत
कधी कधी तर ते तयारही केले जातील
मार्ग मात्र माझा मलाच काढायचा आहे
खचून न जाता मला फक्त लढायचं आहे

ही लढाई नसणार आहे तलवार आणि ढाल घेऊन
असेल ती तत्त्व सांभाळून लढणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन

कारण मला चालायचं आहे
ध्येय मला माझं गाठायचं आहे

माहितीय मला की,माझ्या पायात पाय घालणारी खूप आहेत माणसं अवतीभवती
मला पाडण्यासाठी मनं गुंतलीत त्यांची
त्यांना सांगा एवढंच की
सोपं नाही एवढं लढणं, तत्त्व घेऊन चालणाऱ्यांशी
कारण आत्तापर्यंत कधीच नाही दिला दगा तत्त्वांनी

तत्त्वांचे हे अजिंक्यपण गृहीत धरूनच तर मला चालायचं आहे
ध्येय मला माझं गाठायचं आहे

वाटेत बरेच जण भेटतील मला चुकीच्या गोष्टी सांगणारे
अप्रत्यक्षरीत्या मला भरकटू पाहणारे
मला मात्र माझ्या ध्येयाकडे चालायचंच आहे
कारण ध्येय मला गाठायचे आहे

अशा प्रकारे ध्येय गाठणे कदाचित अवघडही असेल
पण त्याचा होणारा परिणाम सुद्धा मग चिरकालीन असेल
त्यावर अनेक जणांना ध्येयाकडे चालताना पाहून डोळे माझे सुखावून जातील
त्यावेळी कदाचित ध्येयांसोबत डोळेही पाणावले जातील

कोणताही शॉर्टकट घेतला नसल्याने हेच लोक मग अभिनंदन करत राहतील
कारण तत्वांशी मी प्रतारणा केलेली त्यांनी कधी पाहिली नसेल
मी केवळ सन्मार्गावरून चालत राहिलो असेन

माझी लढाई मी लढली असेन
माझी लढाई मी कायमची जिंकलेली असेन..!

© अमित संजय कुलकर्णी
     गडहिंग्लज.

बाबा..

बाबा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. आज माझ्या बाबांचा वाढदिवस. खरं तर प्रत्येकाचे बाबा हे त्यांचे आयकॉन असतात. जसे माझेही आहेतच. पण मुलाचं आणि वडिलांच पटतही नाही. बऱ्याचदा आई आणि मुलगा, वडील आणि मुलगी ह्यांच पटत असे म्हणतात. आमच्या घरातही अगदी असंच आहे. पण खरं सांगू वडिलांचा मुलांना जो छुपा ( Hidden ) पाठिंबा असतो ना त्याची तुलना जगातील कुठल्याही पाठिंब्याशी करता येत नाही. हा एकच माणूस असा असतो कि जो आपला मुलगा , स्वतःपेक्षाही पुढे जाताना खुश होतो. त्याचा मनमुराद आनंद घेतो. वक्त हा अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन ह्यांचा सिनेमा  (picture) बघताना मला हे पावलोपावली जाणवतही. मुलाच्या शिक्षणानंतरही त्याला नोकरी लागत नसताना हाच बाप त्याच्या मुलाच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. बेटा तू लढ मी आहे पाठीशी असे म्हणताना तो आतून मात्र मुलाला जॉब लागत नाही म्हणून तळमळत असतो.
बऱ्याच जणांना असे बाबा अनुभवायला मिळतात. ज्याप्रमाणे आई मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे एक वडील ही मुलाच्या सर्व ईच्छा, आकांशा ,मुलांचे करिअर पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या सर्व आवडी निवडी पाण्यात घालतात. मुलाच्या प्रत्येक अपयशात साथ देताना डोळ्यातील अश्रू लपवणे हे कसब आहे, आणि मुलाला योग्य वळणावर आणण्यासाठी रुद्रावतार घेऊन मनातल्या मनात रडणे हे सुद्धा कसबच आहे. बाप ह्या दोन्ही गोष्टी सहजरित्या करताना दाखवत असतो आणि म्हणूनच तो बाप असतो.
पण हाच बाबा मुलाच्या यशात विजयाचा उन्माद करतो, जणू काही त्याच्या मुलाने मिळवलेले यश जगातील  पहिल्यांदाच मिळवलेले यश आहे अशा अविर्भवात तो सगळ्यांना सांगत राहतो. त्याच मुलावर असलेलं प्रेम ज्या मुलाला समजलं तो मुलगा धन्य झाला. कारण बऱ्याच मुलांना त्यांच्या वडिलांची किंमत नसते. बाबांची चार चौघात चेष्टा करणे, मित्रांनी एखाद्याच्या वडिलांना जरी एकेरी नावाने जरी हाक तरी त्यात सामील होऊन स्वतः हसणे ह्याचा अर्थ त्यांना बाप समजलाच नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो की जास्त बोलू नकोस तुला बाप आठवायला लागेल. पण ह्या वाक्यातच बाप हि केवढी मोठी व्यक्ती आहे हे कळते आणि बापाचा आधार सुद्धा कळतो
जगातील प्रत्येक वडिलांच महत्त्व अगणित आहे, अनन्यसाधारण आहे. वडिलांच महत्व कळायच असेल तर वडिलांच्या जवळ जाव लागतं.मुलाने वयात आल्यावर वडिलांशी गप्पा आणि संवाद साधला तर मुलाच आणि वडीलांच नातं फुलत जात. दोघेही जवळ येतात. वडील मग त्यांच्या तरूणपणातील गोष्टी सांगतात.खूप रमतात दोघे गप्पात. मुलाला आश्चर्य वाटत राहतं कि अरे आपण करत असलेल्या गोष्टी आपल्या वडिलांनी सुद्धा केलेल्या आहेत ना. मग दोघेही मनमुराद हसतात. ह्या गप्पा चालत असताना मुलगा एकदम भावनाशील होतो. एकदम उठतो आणि बापाला घट्ट मिठी मारतो. कारण खऱ्या अर्थाने त्याला आता त्याचा बाबा समजत चाललेला असतो. मूल आणि वडिलांच नातं अगदी सहज आणि सुंदर आहे.
जसं माझं आणि माझ्या वडिलांच नातं आहे. माझ्या वडिलांनी ते फुलवलंय. त्यांनी योग्य वेळेत योग्य भूमिका बजावल्यात जसं लहानपणी ओरडून, मारून, कधी कष्टाचं महत्त्व सांगून तर कधी पैशाचं महत्व पटवून, योग्य वयात समजून सांगून, गप्पा मारून , अगदी वेगवेगळ्या पद्धतीने. माझ्या प्रत्येक निर्णयात मला त्यांनी पाठींबा दिलाय. मला मदत केलीय. माझ्या पाठीशी आई बाबा दोघेही ढालीसारखे उभे राहिले. आपण खूपदा म्हणतो की चांगले आई व वडील मिळायला भाग्य लागते, पण प्रत्येक आई वडील हे चांगलेच असतात. चांगला मुलगा किंवा मुलगी होणे जास्त चांगले आणि महत्वाचे असते. त्यांच्या सहवासात तुमचे व्यक्तिमत्व घडेल, फुलेल आणि मग जगातील सुंदर नात्यांचा अनुभव आपल्याला घेता येईल. मी या सुंदर नात्यांचा अनुभव घेत आलोय याहून माझे नशीब ते कोणते. म्हणूनच मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी आई वडिलांपासून दूर राहून जॉब करण्यापेक्षा मला माझ्या आई वडिलांबरोबर राहायला मिळते हे माझे भाग्यच. Love you आई बाबा..

©अमित संजय कुलकर्णी
    गडहिंग्लज.

Tuesday, November 22, 2016

मामाजी

आज आमच्या मामाचा वाढदिवस.आईचा भाऊ म्हणजे मामा हे लहानपणी आम्ही शिकलो आणि त्यानंतर मामाच्या गावाला जाऊया हे गाणं तर प्रत्येकाच्या ओठावर आहे. मामा हे काही जणांच्या मनात धास्ती म्हणून असतात तर मामा हा काही जणांच्या मनात जवळचा मित्र म्हणून असतो. पण आमचा अभय मामा हे व्यक्तिमत्व खुपच वेगळं. मी आमचा मामा असा उल्लेख का करतोय असा विचार तुम्ही करत असाल पण तो आम्हा सर्वांचा आहे. त्याच्या बहिणी  आणि भाऊ,त्याची पत्नी, त्याच्या मुली, त्याचा प्रत्येक भाचा आणि भाची, त्याच्या पुतण्या ह्या सर्वांचा तो विकपॉइंट.
भाचा आणि भाच्यांसाठी तर तो म्हणजे गप्पा आणि अनुभवाने भरलेली खाण.मामाचा धाक आम्हाला असा कधी वाटलाच नाही.साधारणपणे आम्ही कॉलेजच्या वयात आल्यापासून जास्त जवळ आलो. म्हणजे मी असेन किंवा माझा प्रसाद दादा असेल. एकतर तो प्रोफेसर,त्यामुळे तो आम्हाला खूप छान समजून घ्यायचा. त्याला अशा वयातील मुलांची मानसिकता पटकन समजून यायची.
तो खूप भारी आहे. इतका कि आम्ही काहीतरी प्रॉब्लेम त्याला सांगत असताना,त्याच काय असतं कि ओशो म्हणतो,असं म्हणत त्याचा हात आमच्या खांद्यावर कधी पडला हे आम्हाला कळलंच नाही आणि त्यानंतर तो आम्हा सर्व मंडळींच्या गळ्यातला ताईत झाला.आम्हाला कॉलेजला असताना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून आम्ही त्याच्याकडे बघायचो.बऱ्याच वेळा मित्रांशी न बोलता मामाशी बोललेलं आवडायचं कारण मामा हा आमचा मित्र बनत चालला होता.  मनातील गोष्टी ओळखायच्या कश्या,माणसं कशी ओळखायची,माणसे जोडायची कशी,जोडलेली माणसे टिकवायची कशी,सर्वांशी कसे हसत खेळत राहायचं,कोणाशी कसं वागायचं,परिस्थिती कशी हाताळायची,ती हाताळताना सर्वाना खुश ठेवायचा प्रयत्न कसा करायचा,वेळेनुरुप बोलण्यातील बदल कसा करावा,शेती कशी करावी,निर्णय कसा घ्यावा आणि कसा घेऊ नये,हजरजबाबीपणा,नाते टिकवताना होणारी कसरत आणि स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसं ठेऊन आणि दुसऱ्याला हसवत मै जिंदगी का साथ निभाता चला गया,असं म्हणत कसं रहावं ह्यासारख्या कितीतरी गोष्टी आम्ही त्याच्याकडून शिकलो.टोकाचा संयम हि त्याची अजून एक जमेची बाजू.त्याच्या संयमावर एक पुस्तक लिहून एखादा माणूस p.hd करेल.
तसा टोकाचा संयम माझ्या मावशीकडे, आईकडे आणि दोन्ही मामांकडे  आहे कारण माझी आज्जी टोकाची संयमी होती, आणि हाच गुण ह्या सर्वांकडे आला जो आजच्या जगात खुपच विरळाने आढळतो.असो,मी परत मामाकडे वळतो.
मामाकडे कधीही जावा किंवा त्याला फोन करा,तो कधी वैतागलेला,त्रासलेला दिसणार नाही.त्याउलट आम्ही वैतागलेले असलो,त्रासलेले असलो कि त्याच्याशी बोलतो.मामा असेल किंवा मामी असेल , दोघेही सदैव हसत.मामा आणि मामीला आम्ही भरपूर चिडवतो,मी वैयक्तिकरित्या तर मामीला खूप चिडवतो पण ना मामीला राग येत ना मामाला. उलट तो आणि आमच्याबरोबर मामीला चिडवण्यात पुढे.पण सहचारिणीबरोबर कसं रहावं किंवा कसं नातं टिकवावं हे सुद्धा त्याच्याकडूनच शिकावं.चुकल्यानंतर सांभाळून घेणं त्याच्याकडून शिकावं.मुलांबरोबर ज्या त्या वयात कसं राहावं हे मामा आणि माझ्या आईकडून शिकावं.आम्ही असू किंवा कोल्हापूरच्या मावशीची मुलं असतील , आम्ही सर्व आईच्या माहेरशी जास्त संपर्कात असतो.त्याच कारण मामा मामी.आज मामा मामी, या म्हणून सगळ्यांच्या मागे लागतात.रहायला लावतात.आमच्या आवडीचे पदार्थ करतात.मामा अजूनही icecream आणतो.आम्ही अजूनही दंगा घालतो,गाण्याच्या भेंड्या खेळतो,कोणालातरी एकाला पकडून चिडवून चिडवून त्याला रडवतो, आणि परत यायच्या दिवशी तोंडं लहान करतो.मग परत मामाच परत भेटायचं नियोजन करतो,परत हसवतो आणि गाडी वळेपर्यंत बाय करत राहतो.

माझे आजोबा मागच्या वर्षी गेले.तसं म्हंटले तर आजी खूपच आधी गेलेली. पण मावशी,आई ह्यांना माहेर संपेल अशी नाही भीती वाटली किंवा आम्हाला आता आजोळ संपले असे नाही वाटले, उलट आम्ही अजून जास्त जवळ आलो. सर्वांनी नाते टिकवून ठेवलंय. अजून घट्ट झालंय. ह्याला माझ्या आज्जीचे संस्कार कारणीभूत आहेत. भावा बहिणींचे नाते कारणीभूत आहे. बहीण भावांच्या नात्याचे उत्तम उदाहरण आहे. बघा ना काय योगायोग आहे. आज हा लेख लिहितानाहि आई माहेरी आहे.
 आम्ही सर्व रक्ताच्या नात्यांनी एकत्र आहोत म्हणून आम्ही सर्व एकत्र असू, एकदम मान्य. पण माझ्या दादाच्या अर्धांगिनी,  सौम्या वहिनी असतील किंवा माझी बायको प्रिया असेल ह्या सुद्धा मामा मामीच्या फॅन आहेत. चिक्कोडी म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामा म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामाचा फोन म्हंटले कि दोघी खूष. आमच्या सर्वांचे हे नाते खूप घट्ट आहे आणि ते पण आज्जी आजोबांमुळे आणि त्यानंतर मामामुळे.
मामाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडताहेत, कारण विषय खूप मोठा आहे आणि लिहिताना भावनिक व्हायला झालं की शब्द रुसतात.आता माझंही तसंच झालंय
आज माझ्या मामाला बावन्न वर्षे पूर्ण झालीत. त्याला आज आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.जुग जुग जिओ मामाजी.🎂

©अमित संजय कुलकर्णी.
    गडहिंग्लज.

Wednesday, November 2, 2016

आई वडीलांनंतर ती..

आई वडीलांनंतर ती..
खरं तर आई वडीलांनंतर ती हे शीर्षक कोड्यात टाकणारेच आहे. ती म्हणजे नक्की बायको, गाडी कि आणि कोण असे तुमच्या मनात येईल पण इथे ती म्हणजे दुसरी तिसरी नसून बहीण असते. आज बहीण भाऊ ह्यांचे नाते मी दोन दृष्टीकोनातून मांडणार आहे.
बहीण प्रत्येकाला पाहिजेच.पण ती मोठी कि लहान असा प्रश्न मनात येणे योग्य नाही कारण दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या आहेत. आज मी भाऊ या नात्याने ह्या दोन्ही बाजू खूप वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे.
कारण मी लहानपणी बहीण पाहिजे म्हणून रडलेलो आहे आणि बहीण जन्मल्यावर खूप आठवणी पण हृदयाच्या कोपऱ्यात दडवलेल्या आहेत. काल भाऊबीजेच्या रात्री संपूर्ण दिवस बहिणींबरोबर घालवल्यावर झोपताना ह्या आठवणी डोळ्यासमोर आल्या, म्हणून माझा खूप जवळचा भाऊ आणि मित्र अमितला मी मेसेज केला की अमित नवीन लेख लिहतोय. लहान बहीण असल्यामुळे दादा हा शब्द बऱ्याच वेळा वेगवेगळ्या आवाजाच्या चढ उताराने ऐकायला मिळतो. आवाजाच्या अंदाजाने काम ओळखणे हि कला फक्त भावांनांच कळते. माझ्या बहिणीचीही गोष्ट अशीच. तशी ती लहानपणापासूनच आपण बरं आणि आपलं काम बरं अशा अवस्थेतून असलेली. त्यामुळे ओळखीच्या लोकांशी बोलणंही तसं कमीच . त्यामुळे ये दादा, ऐक तरी असं ती म्हणाली, म्हणजेच मस्का लावला की बोला काम बोला असं माझं पहिलं वाक्य. खरं तर आम्ही बहीण भाऊ कधी भांडलो  नाही असं म्हणणारे भाऊ बहिण असूच शकत नाहीत. कारण भांडणे हा बहीण भावांचा जन्मसिद्द्ध हक्क आहे. कारण ते भांडण असं नसतंच, ते असतात रुसवे फुगवे. आम्ही दररोज भांडायचो, आताही भांडतो. माझ्यापेक्षा माझ्या बहिणीच माझ्यावर अतिशय प्रेम. दादा म्हणजे तिचा weakpoint. लहानपणापासून ती माझ्याबद्दल भरभरून बोलताना अजिबात कंटाळत नाही. काही झाला तरी दादा पाहिजेच. मला लहानपणापासून एक भीती वाटायची कि हि बया सासरी गेल्यावर कसं व्हायचं पण ही सासरी गेल्यावरसुद्धा दादा पुराण चालूच आहे. मी कोल्हापुरात शिकायला बाहेर पडलो तेव्हा आमचं ध्यान पाचवीत होत. दादा येताना खायला हे घेऊन ये, मला बटणं असलेली कंपास बॉक्स पाहिजे, मला मेकअप चा बॉक्स पाहिजे, मला टॉप पाहिजे, दादा गाणं मिक्स करायचं आहे गॅदेरिंग चे,  ये नारे असा काय असे अनेक हट्ट असायचे. तिचा डान्स मी कधी पहिलाच नाही कारण  तिच्या डान्स च्या वेळी मी एकतर फोटो घेण्यात किंवा शूटिंग करण्यात मग्न असायचो. बऱ्याच वेळा तिला कोल्हापुरातून ड्रेस आणताना मैत्रिणींना घेऊन जावे लागायचे. माझीच न्हवे तर माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींची ती लाडकी बहीण होती. टोल संस्कृतीची तर माझी बहिण जनक आहे कारण  मित्र घरी यायचे असतील तर dairy milk चा टोल आधी बहिणीला  द्यावा लागायचा, अजूनही तसच आहे. तीन महिन्यांपूर्वी कोकणात असलेल्या माझा जवळचा मित्र राहुल हिंगे याला मी फोन केला कि राहुल्या मला एक किलो काजू आणि मालवणी मसाला पाठवून दे. त्याने तो मला त्या दिवशी पाठवला नाही. संध्याकाळी फोन केल्यावर म्हणतो की पाऊस खूप होता म्हणून नाही गेलो. मी म्हंटले अरे पूजाला ( आमच्या बहिनाबाईंचं नांव) पाहिजे, तर पठ्ठा दुसऱ्या दिवशी साहेब भिजत जाऊन एस.टी ने मला पाठवून दिले. एवढा सर्वांचा तिच्यावर जीव. पण तिने पण सगळ्यांना एवढाच जीव लावलाय. आज ती माहेरी आली की सगळ्या मित्रांना आणि माझी मामेबहिण श्रेयाला फोन करते. तिला बोलवून घेते आणि मित्रांना फोन करून टोल आंदोलन सुरू. बहिणींचा हट्ट कसा असतो हे तिच्याकडून शिकावे. पण ह्यात एक मजा आहे. तिचा हट्ट पूर्ण करण्यात, तिला चिडवण्यात , तिला रडवण्यात, तिचे कौतुक करण्यात आणि तिच्या मागण्या पूर्ण केल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद बघण्यात. मला तिला समाधानी नाही बघायचं कारण मग हट्ट कोण करणार आणि आम्ही तरी तो पूर्ण कसा करणार, हा पण तिला सुखी बघायचंय. तुम्हा सर्वांची छोटी बहीण अशीच असेल ना. तुम्हाला एखाद्या मुलीचा फोन आल्यावर काय दादा, आ, काय हे, कोण हि , आईला सांगू , मग फोन वरील कोणीच नसताना आपण उगाच घाबरल्यासारखा करायचो. मग ती चॉकलेट मागायची आणि मग आपण हि द्यायचो. पण ह्यात एक वेगळीच गंमत असायची. खूप लिहिता येईल पण अजूनही मोठ्या बहिणीसाठी लिहायचंय. नाहीतर मोठ्या बहिणीला राग यायचा. खरं तर मला मोठी सख्खी बहीण नाही. पण मला मावस बहिणी आणि मामे बहिणी खूप आहेत. माझ्या मोठ्या मावशीच्या मुली माझ्यापेक्षा मोठ्या. पण प्रसाद दादा ( मावशीचा मुलगा) पेक्षा आरती ताई आणि तिट्या ने माझे खूप लाड केले. मला आवडणारे पदार्थ, घरी आणि बाहेरही खायला दिले. मला बरं नसतांना भाऊजींना पाठवून दवाखान्यात न्यायला लावले. पण ह्या सख्या नात्यांच्या पलीकडेही स्नेहल ताई, माई, दीदी मला भेटली. आमचे घरमालकांच्या त्या मुली. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या सर्व. पण स्नेहल ताईचे सासर माणगाव मधेच असल्यामुळे मला नेहमी भेटायची. ती आईची मैत्रीण. त्यामुळे ती घरात नेहमी यायची. मोठ्या बहिणीची माया तिने दिली.  कधी निर्णय चुकायला लागले की सल्ला द्यायची.
काल माझ्या सासरी माझे सासरे त्यांच्या बहिणींबद्दल बोलत होते.अगदी भरभरून.. तिने सावरले. खूप प्रेम दिले.मोठी बहीण अशीच असते. भावांना सावरणारी, भावांना सल्ला देणारी, चुकलात तर ओरडणारी, कान पकडणारी.. भावाला पुढे आणण्यासाठी प्रसंगी ढाल बनणारी आणि बऱ्याच वेळा भावाच्या सर्व इच्छा पूर्ण करता स्वतःची स्वप्न मागे टाकणारी. डोळ्यात येणारी आसावे हळूच पुसताना आपण बघितलेच तर काही नाहीरे, डोळ्यात काहीतरी गेलं बघ असे हसत म्हणणारी. आई वडिलांनंतर आधार आणि सांभाळणारी.. मोठी किंवा छोटी असो पण जीव लावणारी. आम्ही हे नाते आई मामांच्या रुपात बघितले. भाऊ बहिणींचे नाते कसे असावे ते आम्ही त्यांच्याकडून अनुभवत आलो..म्हणूनच मी म्हणतो आई वडीलांनंतर ती.. आपल्या सर्वांची लाडकी तीच लाडकी बहीण...


तुमचाच,
© अमित संजय कुलकर्णी.
      गडहिंग्लज.
      9404968084

Thursday, October 20, 2016

म्हणे अजगरासोबत सेल्फी काढताना अजगर चावला..

म्हणे अजगरासोबत सेल्फी काढताना अजगर चावला..

आजकाल सेल्फी काढायचे प्रस्थ वाढायला लागलय. दोनच दिवसांपूर्वी मी एका न्युज चॅनेल वर त्याची बातमी पाहिली. सेल्फी काढताना अजगर चावला, मगरीसोबत फोटो काढताना मगरीने गिळले आणि बऱ्याच वेळा फोटो काढताना तोल जाऊन पडून मृत्यू. खरं तर अशा बातम्या पालकांना काळजी करायला लावणाराच आहे. कारण मी गेले एक वर्ष पाहतोय कि सेल्फी मुळे बऱ्याच जणांना त्यांचा जीव या ना त्या कारणाने गमवावा लागलाय. सेल्फी काढू नये असे माझे अजिबात मत नाहीय. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. कारण मग त्यासाठी आपण मागे लागतो आणि मग होत्याचे न्हवतं करून बसतो. माझा आजचा विषयच अतिरेकावर आहे.
अतिरेकाची बरीच उदाहरणे मी हल्ली जवळून अनुभवत आहे. एकतर कॉलेज मधील मुलांना शिकवताना त्यांना जवळून बघता येतं आणि अतिरेकाची भूमिका खूप जवळून बघता येते.पण अतिरेक हा फक्त कॉलेजच्या मुलांमध्येच आहे असं नाही. तो एक त्यातील भाग आहे.
पहिला अतिरेक म्हणजे आपल्या पालकांकडून मुलांवर असलेल्या अभ्यासाचा आणि अपेक्षांचा अतिरेक.
माझा पाल्य हा प्रत्येक क्षेत्रात पारंगत झाला पाहिजे कारण ती आजच्या पिढीची गरज आहे ह्या खोट्या भ्रमात पालकांचे वावरणे. त्यातून मग सुरु होते कोवळ्या वयातील मुलांकडून त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळ आयुष्यातील गरज नसलेल्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून छिनावून घेण्याचा काळ.
खरं तर त्यांचे बालपण त्यांना उपभोगता यायला हवं.
त्यांच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम काळ. ज्या वयात माझ्या किंवा माझ्या अगोदरच्या काळातील कितीतरी जण आमच्या लहानपणी माती खाण्यापासून, मातीत राड होईपर्यंत आणि सायकलची चेन पडली तर ती लावण्यासाठी हातापासून शर्ट आणि पँट काळी करण्यात आमचे बालपण गेले. रस्त्यावरचे हैस्पृट( बर्फाचे icecream), चणे, वाटाणे ते अगदी पाणपोईला हात लावून पाणी पिताना आम्हाला किंवा आमच्या आई वडिलांना काहीच नाही वाटले. पण आज मुलांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना मोबाईल देणे , मॉल मध्ये शॉपिंग करणे, इलेक्ट्रीक सायकल किंवा बाइक देणे आणि सीडलेस फळे देण्यापासून ते लो कोलेस्ट्रॉल असलेली चॉकलेट्स देणे हे सर्व चालू आहे. त्याच कारण तर मुलांचा वेळ वाचणे याबरोबरच त्यांना मोठेपणी ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये असा असतो.
पण मुलांच्या म्हातारपणीचा त्रास वाचवण्यासाठी आज ते मुलांच्या वर्तमानकाळाचा का बळी देतात हे लक्षात येत नाही. तोंडातुन एखादी गोष्ट बाहेर पडली की ती लगेच देण्यामुळे आज त्यांना त्याचे महत्व कळेनासे झालंय.
तसंच आजच्या काळातील काही मुलांचं पण आहे. त्यांना मिळालेल्या अमर्याद स्वातंत्र्याचा ते गैरवापर करताहेत. आई वडिलांनी ठेवलेल्या विश्वासाचा ते चुकीचा वापर करताहेत. त्यामुळे आज हीच मुले त्यांच्या क्षमता चुकीच्या ठिकाणी वाया घालवताहेत. आजची पिढी हि खूप हुशार आहे पण ती हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली जाणे हे साहजिकच चिंताजनक आहे. हि मुले अतिरेकाच्या आहारी जायला लागलेत. अतिरेकाच्या विळख्यातून ह्यांना सोडवण्याची जबाबदारी आता मात्र शिक्षकांची आणि पालकांची आहे. पण अतिरेकाच्या विळख्यातून आज खऱ्या अर्थाने शिक्षकांनी आणि पालकांनी स्वतः अतिरेकाच्या बळीपासून वाचण्याची असे म्हणत बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले हि म्हण सार्थ करणे गरजेची आहे, असे मला वाटते.

 © अमित संजय कुलकर्णी.
     गडहिंग्लज.

Saturday, October 8, 2016

शिकवा मुलांना झेपावण्यासाठी--

शिकवा मुलांना झेपावण्यासाठी--

मी माझं काम करत राहतो फक्त..खरंच माहित नसते मी यशस्वी होईन कि नाही..
खरंच मला फक्त शिकवायचं असतं, मला माझं 100 % योगदान द्यायचं असतं.. माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आवडेल कि नाही नसतं मला माहीत..
पण मला मुलांना शिकवायचं असते त्यांना कळेपर्यंत.. अगदी जीव तोडून.. शिकवायचं असते त्यांना पुढे नेण्यासाठी..तयार करायच असतं त्यांना ह्या जगात सध्या लागणाऱ्या knowledge साठी..
माझे उद्देश स्पष्ट असतात अश्या वेळी.. माझ्यासमोर त्यांना काय शिकवायचे ह्याचा आराखडा कधीच तयार नसतो कारण आराखडा तयार करून शिकवायला मला कधीच जमल नाही आणि जमणार पण नाही..जे ज्यावेळी गरजेचं ते त्यावेळी शिकवायचं.. कारण माझ्या विद्यार्थांना मी syallbus तर शिकवतच असतो..आणि त्यात माझे विद्यार्थी नेहमीच चांगल्या मार्कांनी पास होत असतात आणि top पण येत असतात.. कारण आम्हा दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास असतो आणि तो विश्वास आम्ही शिक्षक विद्यार्थी आणि मित्र अशा भूमिकेत मिळवत असतो..माझे विद्यार्थी मग भरभरुन गप्पा मारतात माझ्याशी.. बऱ्याच विषयांवर आम्ही बोलतो..कालच माझ्या बारावीच्या एका विद्यार्थिनीने विचारलं मला, सर GST म्हणजे काय हो...बरं वाटलं खूप मला..मुलं साच्याच्या बाहेर येताहेत..
पण...पण...
पण मगच सुरु होते खरी लढाई..कारण हा साचा बऱ्याच जणांना माहित नसतो, मुलांनी ह्या अभ्यासाच्या पलीकडे कधी पाहिलेलं नसते.. typical class ह्या concept मध्ये बरेच जण बाहेरच पडत नाहीत.. change is necessity हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत खूप वेळ झालेला असतो.. pune आणि mumbai सारख्या शहरात गेल्यावर ह्यांच्या marks ना कोणीच विचारत नाहीत.. पण ह्यासाठी आपली Education system जेवढी जबाबदार आहे त्यापेक्षाही जास्त आपले विद्यार्थी जास्त जबाबदार आहेत.. कारण विद्यार्थी कि गुणार्थी किंवा ज्ञानार्थी हे कळेपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.. आणि मग graduation किंवा post graduation नंतर सुरु होते त्यांची लढाई.. खेड्यातील बरीच मुले लढतात मग communication बरोबर.. मग ते
English असो किंवा मराठी..कारण त्यांना कधी कोणी सांगितलेच नसते कि excellence म्हणजे काय.. मग deal करतात ते त्यांची degree 5000 -6000 मध्ये.. corporate वाले ह्याचा उपयोगच करायला बसलेले असतात.. कोण म्हणतो fresher ना चांगली salary मिळत नाही.. तुम्ही तशी salary मिळण्यासाठी स्वतःला तयार तर केलं पाहिजे ना.. अरे लाथ मारेल तिथे पाणी काढेन असे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत हे असेच होणार.. तुम्ही जोपर्यंत तुमची गरज निर्माण करणार नाही तोपर्यंत हे असंच होणार.. मग डोक्याला हात लावून बसणारच ना कि एवढे शिकून काय उपयोग.. पण त्यात चूक तुमचीच आहे ना.. तुम्ही मार्क मिळवण्यासाठी अभ्यास केला , excellence साठी नाही त्याचीच ही फळ आहेत..
मी सुरुवात केली बदल करायला मग..यासाठी माझ्या क्लास मधून.. Student Excellence Activity राबवून.. ज्यांना ह्याचे महत्व कळालं ते माझ्यासोबत थांबले आणि ज्यांना mark हवे होते ते बाहेर गेले.. पण गंमत अशी की माझी मुले नेहमीच topper आलीत अगदी कालच्या निकालापर्यंत.. अगदी काल पण माझ्या क्लास ची मुलं test मध्ये पण topper आली.. तीच सर्व Cultural मध्ये, sports मध्ये , कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन , सूत्रसंचालन करण्यामध्ये तरबेज आहेत..  अभिमान आहे मला कि माझी मुलं allrounder होताहेत.. जशी आजच्या coroprate ला हवेत तसेच..
मुलांना शिकवा हो अगदी भरभरून.. पण खूप खोलात जाऊन शिकवा.. असे कधीच करू नका जेवढं syallbus ला आहे.. त्यापलीकडे जे आहे ते सांगा नाहीतर तुमची मुलं कधीच या जगात टिकू शकणार नाहीत.. त्यांना झेपावण्याची शक्ती दया , ऊर्जा दया.. या आकाशात उडू देण्यासाठी त्यांच्या पंखात बळ द्या , एवढीच विनंती.

तुमचाच,
अमित कुलकर्णी.


©अमित संजय कुलकर्णी.

Tuesday, October 4, 2016

अक्षरेच बोलू लागतात माझ्याशी

अक्षरेच बोलत राहतात मग माझ्याशी..

मलाही माहित नसते नक्की काय करायचं. मन मोकळं करण्यासाठी काही वेळा योग्य माणसेच सापडत नाहीत, ती कार्यमग्न असल्यामुळे. मग कोणाशी बोलणार मी. काय करायच अशा वेळी. मन मोकळं करायचं असतं. मग डोकावत राहतो मी भूतकाळात.
भूतकाळातील माझा छंद मला पुन्हा खुणावत राहतो. मग अ, ब, क पासून सर्व अक्षरे मेंदूत येत राहतात माझ्या आणि मग बोलायला लागतात माझ्याशी. मग आपोआप हात वळवळायला चालू होतात आणि मग माझ्या हातात एका क्षणात पेन येत. सुरु होतात मग माझे सूर त्या कागदाबरोबर.
मी उतरवत जातो फक्त माझ्या मनातील शब्द. हळूहळू कागद भरत जातात आणि अक्षरे बोलू लागतात माझ्याशी. तेच मला प्रेरणा देतात मग लिहीण्यासाठी. खूप वेळ मग आम्ही गप्पा मारतो. ती मला चिडवतात आणि मग मी का शांत बसेन , मी हि चिडवतो खूप त्यांना. मग अक्षरे रडतात , कागद ओले होतात. मग मलाच वाईट वाटते. मग मी पुन्हा हसवतो त्यांना. भूतकाळातील आठवणी सांगून. आणि ह्या आठवणी काढताना माझेच डोळे मग पाणावू लागतात. कागद फडफडत राहतो मग वाऱ्यावर आणि अचानक थांबतो तो कुठल्यातरी पानाकडे येऊन. मी खाली बघतो तर माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे पान त्याने उघडलेलं असते. मग ते वाचून पुन्हा आम्ही हसू लागतो. आम्ही पुन्हा रमतो मग आमच्याच भावविश्वात. अक्षरं पुन्हा उमटू लागतात माझी. मग मात्र तो पण रडत नाही आणि मी हि रडत नाही. कारण आम्ही ठरवलेलं असत , सारखं नाही रडायचं, आपण फक्त हसायचं आणि हसवायच, मनमुराद लिहायचं आणि वर्तमानकाळात जगत रहायचं. आम्ही दररोज नाही भेटत. कधीतरीच भेटतो, पण भेटलो कि बऱ्याच वेळ गप्पा मारतो. पण मध्येच तो मला थांबवतो आणि म्हणतो अमित मला जायचंय. एक महत्वाचे काम आहे. आताही गप्पा रंगत आल्यात पण तो तेच सांगतोय, कि मला जावं लागणार आहे. परत येतो म्हणे 4 दिवसात. ठीक आहे मित्रा जातोच आहेस तर जा लेका. परत भेटूच.
अशी आहे माझी कागद आणि अक्षरांसोबतची मैत्री.
म्हणूनच मी म्हणतो ना की, अक्षरचं बोलत राहतात मग माझ्याशी....

© अमित संजय कुलकर्णी
     गडहिंग्लज
     मोबा- 7744003900