Wednesday, December 28, 2016

ध्येय

मी चालत राहतो माझ्या ध्येयावर
आणि, चिंता सोडून देतो वाऱ्यावर

मला माहिती असतं की,
येणारच माझ्या वाटेत अडथळे
इथे अडथळे करणाऱ्यांचेच तर जमलेत मेळे

तरीही मला चालायचंच  आहे
ध्येय मला माझं गाठायचं आहे

कधी कधी खड्डे लागतीलही वाटेत
कधी कधी तर ते तयारही केले जातील
मार्ग मात्र माझा मलाच काढायचा आहे
खचून न जाता मला फक्त लढायचं आहे

ही लढाई नसणार आहे तलवार आणि ढाल घेऊन
असेल ती तत्त्व सांभाळून लढणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन

कारण मला चालायचं आहे
ध्येय मला माझं गाठायचं आहे

माहितीय मला की,माझ्या पायात पाय घालणारी खूप आहेत माणसं अवतीभवती
मला पाडण्यासाठी मनं गुंतलीत त्यांची
त्यांना सांगा एवढंच की
सोपं नाही एवढं लढणं, तत्त्व घेऊन चालणाऱ्यांशी
कारण आत्तापर्यंत कधीच नाही दिला दगा तत्त्वांनी

तत्त्वांचे हे अजिंक्यपण गृहीत धरूनच तर मला चालायचं आहे
ध्येय मला माझं गाठायचं आहे

वाटेत बरेच जण भेटतील मला चुकीच्या गोष्टी सांगणारे
अप्रत्यक्षरीत्या मला भरकटू पाहणारे
मला मात्र माझ्या ध्येयाकडे चालायचंच आहे
कारण ध्येय मला गाठायचे आहे

अशा प्रकारे ध्येय गाठणे कदाचित अवघडही असेल
पण त्याचा होणारा परिणाम सुद्धा मग चिरकालीन असेल
त्यावर अनेक जणांना ध्येयाकडे चालताना पाहून डोळे माझे सुखावून जातील
त्यावेळी कदाचित ध्येयांसोबत डोळेही पाणावले जातील

कोणताही शॉर्टकट घेतला नसल्याने हेच लोक मग अभिनंदन करत राहतील
कारण तत्वांशी मी प्रतारणा केलेली त्यांनी कधी पाहिली नसेल
मी केवळ सन्मार्गावरून चालत राहिलो असेन

माझी लढाई मी लढली असेन
माझी लढाई मी कायमची जिंकलेली असेन..!

© अमित संजय कुलकर्णी
     गडहिंग्लज.

No comments:

Post a Comment