Saturday, April 8, 2017

माझी नवीन खंड कविता
👇🏻
एकदा एक उत्स्फूर्त वाक्य कानावर माझ्या आलं
"आज-काल लाजाळूचं झाडच दिसून नाही राहिलं"
एकदम माझं लहानपणच माझ्या डोळ्यासमोर येऊन गेलं
अरेरे!, खरंच लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

काय करेल लाजाळू तरी बिचारी लाजयचं का हेच तिला न कळालं
 लाज नक्की सोडलीय तरी कुठं हेच तिला ना उमगलं
खरंच आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

मग मीच तिला आता भेटून विचारायचं ठरवलं
तिच्या रागाचं कारण नक्की काय हे मी हेरलं
"माणसानं निसर्गाशी नातं का तोडलं?",
हे तिचं म्हणणं तिला शोधताना मला जाणवलं
आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं...

शेवटी बोलायला तयार नसताना तिनं एकदम मला म्हटलं,
" सांग तूच बरं तूच मला माणसांकडे मन कुठं राहिलं?
खरं सांगतो आज पहिल्यांदा मी लाजाळूला चिडताना पाहिलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं..

"सांग तूच आता मला माणसाकडं मन कुठं राहिलं ?"
लाजायचं सोड; माणसानं लाजेलाच खेळणं करून ठेवलं !
आज खरंच मी लाजाळूला रागाने लाल झालेलं पाहिलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

"अरे , माणसाने सगळीकडेच लाजेला दावणीला बांधलं...
लाजण्यासाठी त्यानं मला कोणतं कारणच ना ठेवलं...
अरे माणसाने मला आज लपायला भाग पाडलं !
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

खोट्या माणुसकीचं ओझं त्यानं नेहमी वाहिलं
बुद्धिबळाच्या कुजक्या डावात त्यानं मला हरवलं
आज त्यानं मला लपायला पुन्हा भाग पडलं
आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं...

हां, अजूनही थोडी फार लाज आहे शिल्लक म्हटलं
जिथं जिथं ती आहे तिथं मी उगवायचं ठरवलं
पण; आज मात्र माणसानं लाजायचं बंद केलं
आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं..

अपेक्षांच्या ओझ्यात मुलांचं अंगण त्यांनी बंद केलं
छोट्यांनी हात लावायचा अन् मी लाजायचं हे आमचं नातं त्यांनी तोडलं
मगं,मी पण लाजायचं बंद करून टाकलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

अरे, लहान मुलांचं अन माझं नातं किती छान जमायचं
त्यांनी मला हात लावायचा आणि मी लाजायचं
लाज अशीच असते ~हा~हे मी शिकवायचं
पण आज काल मुलांचं मनही कृत्रिमतेतंच अडकलं
म्हणून मी पण आता लपायचं ठरवलं
आज काल लाजाळूचं झाडच नाही दिसून राहिलं...

लाजाळूच्या डोळ्यात आता मात्र पाणी वाहायला लागलं
तिला कसं समजावायचं हे मलाच न उमगलं
म्हंटलं तिला मी, "लाजत जा त्यांच्यासाठी ज्यांनी तुला जपलं "
तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवत मीच तिला म्हंटलं
आणि हसऱ्या लाजाळूला मी पुन्हा एकदा तिच्या रुपात पाहिलं
पण आज काल लाजाळूच झाडच नाही दिसून राहिलं...

मी सांगू का तुम्हाला, लाजाळूचं म्हणणं खरंच नाही चुकलं
आज काल लाजाळूचं मन जपणारं कोणीच नाही राहिलं
    आज काल लाजाळूचं झाडच नाही राहीलं..
        आज काल लाजाळूचं झाडच नाही राहीलं....

लाजाळू
भाग -1

©अमित संजय कुलकर्णी
गडहिंग्लज.
9404968084