Tuesday, November 22, 2016

मामाजी

आज आमच्या मामाचा वाढदिवस.आईचा भाऊ म्हणजे मामा हे लहानपणी आम्ही शिकलो आणि त्यानंतर मामाच्या गावाला जाऊया हे गाणं तर प्रत्येकाच्या ओठावर आहे. मामा हे काही जणांच्या मनात धास्ती म्हणून असतात तर मामा हा काही जणांच्या मनात जवळचा मित्र म्हणून असतो. पण आमचा अभय मामा हे व्यक्तिमत्व खुपच वेगळं. मी आमचा मामा असा उल्लेख का करतोय असा विचार तुम्ही करत असाल पण तो आम्हा सर्वांचा आहे. त्याच्या बहिणी  आणि भाऊ,त्याची पत्नी, त्याच्या मुली, त्याचा प्रत्येक भाचा आणि भाची, त्याच्या पुतण्या ह्या सर्वांचा तो विकपॉइंट.
भाचा आणि भाच्यांसाठी तर तो म्हणजे गप्पा आणि अनुभवाने भरलेली खाण.मामाचा धाक आम्हाला असा कधी वाटलाच नाही.साधारणपणे आम्ही कॉलेजच्या वयात आल्यापासून जास्त जवळ आलो. म्हणजे मी असेन किंवा माझा प्रसाद दादा असेल. एकतर तो प्रोफेसर,त्यामुळे तो आम्हाला खूप छान समजून घ्यायचा. त्याला अशा वयातील मुलांची मानसिकता पटकन समजून यायची.
तो खूप भारी आहे. इतका कि आम्ही काहीतरी प्रॉब्लेम त्याला सांगत असताना,त्याच काय असतं कि ओशो म्हणतो,असं म्हणत त्याचा हात आमच्या खांद्यावर कधी पडला हे आम्हाला कळलंच नाही आणि त्यानंतर तो आम्हा सर्व मंडळींच्या गळ्यातला ताईत झाला.आम्हाला कॉलेजला असताना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून आम्ही त्याच्याकडे बघायचो.बऱ्याच वेळा मित्रांशी न बोलता मामाशी बोललेलं आवडायचं कारण मामा हा आमचा मित्र बनत चालला होता.  मनातील गोष्टी ओळखायच्या कश्या,माणसं कशी ओळखायची,माणसे जोडायची कशी,जोडलेली माणसे टिकवायची कशी,सर्वांशी कसे हसत खेळत राहायचं,कोणाशी कसं वागायचं,परिस्थिती कशी हाताळायची,ती हाताळताना सर्वाना खुश ठेवायचा प्रयत्न कसा करायचा,वेळेनुरुप बोलण्यातील बदल कसा करावा,शेती कशी करावी,निर्णय कसा घ्यावा आणि कसा घेऊ नये,हजरजबाबीपणा,नाते टिकवताना होणारी कसरत आणि स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसं ठेऊन आणि दुसऱ्याला हसवत मै जिंदगी का साथ निभाता चला गया,असं म्हणत कसं रहावं ह्यासारख्या कितीतरी गोष्टी आम्ही त्याच्याकडून शिकलो.टोकाचा संयम हि त्याची अजून एक जमेची बाजू.त्याच्या संयमावर एक पुस्तक लिहून एखादा माणूस p.hd करेल.
तसा टोकाचा संयम माझ्या मावशीकडे, आईकडे आणि दोन्ही मामांकडे  आहे कारण माझी आज्जी टोकाची संयमी होती, आणि हाच गुण ह्या सर्वांकडे आला जो आजच्या जगात खुपच विरळाने आढळतो.असो,मी परत मामाकडे वळतो.
मामाकडे कधीही जावा किंवा त्याला फोन करा,तो कधी वैतागलेला,त्रासलेला दिसणार नाही.त्याउलट आम्ही वैतागलेले असलो,त्रासलेले असलो कि त्याच्याशी बोलतो.मामा असेल किंवा मामी असेल , दोघेही सदैव हसत.मामा आणि मामीला आम्ही भरपूर चिडवतो,मी वैयक्तिकरित्या तर मामीला खूप चिडवतो पण ना मामीला राग येत ना मामाला. उलट तो आणि आमच्याबरोबर मामीला चिडवण्यात पुढे.पण सहचारिणीबरोबर कसं रहावं किंवा कसं नातं टिकवावं हे सुद्धा त्याच्याकडूनच शिकावं.चुकल्यानंतर सांभाळून घेणं त्याच्याकडून शिकावं.मुलांबरोबर ज्या त्या वयात कसं राहावं हे मामा आणि माझ्या आईकडून शिकावं.आम्ही असू किंवा कोल्हापूरच्या मावशीची मुलं असतील , आम्ही सर्व आईच्या माहेरशी जास्त संपर्कात असतो.त्याच कारण मामा मामी.आज मामा मामी, या म्हणून सगळ्यांच्या मागे लागतात.रहायला लावतात.आमच्या आवडीचे पदार्थ करतात.मामा अजूनही icecream आणतो.आम्ही अजूनही दंगा घालतो,गाण्याच्या भेंड्या खेळतो,कोणालातरी एकाला पकडून चिडवून चिडवून त्याला रडवतो, आणि परत यायच्या दिवशी तोंडं लहान करतो.मग परत मामाच परत भेटायचं नियोजन करतो,परत हसवतो आणि गाडी वळेपर्यंत बाय करत राहतो.

माझे आजोबा मागच्या वर्षी गेले.तसं म्हंटले तर आजी खूपच आधी गेलेली. पण मावशी,आई ह्यांना माहेर संपेल अशी नाही भीती वाटली किंवा आम्हाला आता आजोळ संपले असे नाही वाटले, उलट आम्ही अजून जास्त जवळ आलो. सर्वांनी नाते टिकवून ठेवलंय. अजून घट्ट झालंय. ह्याला माझ्या आज्जीचे संस्कार कारणीभूत आहेत. भावा बहिणींचे नाते कारणीभूत आहे. बहीण भावांच्या नात्याचे उत्तम उदाहरण आहे. बघा ना काय योगायोग आहे. आज हा लेख लिहितानाहि आई माहेरी आहे.
 आम्ही सर्व रक्ताच्या नात्यांनी एकत्र आहोत म्हणून आम्ही सर्व एकत्र असू, एकदम मान्य. पण माझ्या दादाच्या अर्धांगिनी,  सौम्या वहिनी असतील किंवा माझी बायको प्रिया असेल ह्या सुद्धा मामा मामीच्या फॅन आहेत. चिक्कोडी म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामा म्हणजे त्यांचा विकपॉइंट. मामाचा फोन म्हंटले कि दोघी खूष. आमच्या सर्वांचे हे नाते खूप घट्ट आहे आणि ते पण आज्जी आजोबांमुळे आणि त्यानंतर मामामुळे.
मामाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडताहेत, कारण विषय खूप मोठा आहे आणि लिहिताना भावनिक व्हायला झालं की शब्द रुसतात.आता माझंही तसंच झालंय
आज माझ्या मामाला बावन्न वर्षे पूर्ण झालीत. त्याला आज आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.जुग जुग जिओ मामाजी.🎂

©अमित संजय कुलकर्णी.
    गडहिंग्लज.

Wednesday, November 2, 2016

आई वडीलांनंतर ती..

आई वडीलांनंतर ती..
खरं तर आई वडीलांनंतर ती हे शीर्षक कोड्यात टाकणारेच आहे. ती म्हणजे नक्की बायको, गाडी कि आणि कोण असे तुमच्या मनात येईल पण इथे ती म्हणजे दुसरी तिसरी नसून बहीण असते. आज बहीण भाऊ ह्यांचे नाते मी दोन दृष्टीकोनातून मांडणार आहे.
बहीण प्रत्येकाला पाहिजेच.पण ती मोठी कि लहान असा प्रश्न मनात येणे योग्य नाही कारण दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या आहेत. आज मी भाऊ या नात्याने ह्या दोन्ही बाजू खूप वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे.
कारण मी लहानपणी बहीण पाहिजे म्हणून रडलेलो आहे आणि बहीण जन्मल्यावर खूप आठवणी पण हृदयाच्या कोपऱ्यात दडवलेल्या आहेत. काल भाऊबीजेच्या रात्री संपूर्ण दिवस बहिणींबरोबर घालवल्यावर झोपताना ह्या आठवणी डोळ्यासमोर आल्या, म्हणून माझा खूप जवळचा भाऊ आणि मित्र अमितला मी मेसेज केला की अमित नवीन लेख लिहतोय. लहान बहीण असल्यामुळे दादा हा शब्द बऱ्याच वेळा वेगवेगळ्या आवाजाच्या चढ उताराने ऐकायला मिळतो. आवाजाच्या अंदाजाने काम ओळखणे हि कला फक्त भावांनांच कळते. माझ्या बहिणीचीही गोष्ट अशीच. तशी ती लहानपणापासूनच आपण बरं आणि आपलं काम बरं अशा अवस्थेतून असलेली. त्यामुळे ओळखीच्या लोकांशी बोलणंही तसं कमीच . त्यामुळे ये दादा, ऐक तरी असं ती म्हणाली, म्हणजेच मस्का लावला की बोला काम बोला असं माझं पहिलं वाक्य. खरं तर आम्ही बहीण भाऊ कधी भांडलो  नाही असं म्हणणारे भाऊ बहिण असूच शकत नाहीत. कारण भांडणे हा बहीण भावांचा जन्मसिद्द्ध हक्क आहे. कारण ते भांडण असं नसतंच, ते असतात रुसवे फुगवे. आम्ही दररोज भांडायचो, आताही भांडतो. माझ्यापेक्षा माझ्या बहिणीच माझ्यावर अतिशय प्रेम. दादा म्हणजे तिचा weakpoint. लहानपणापासून ती माझ्याबद्दल भरभरून बोलताना अजिबात कंटाळत नाही. काही झाला तरी दादा पाहिजेच. मला लहानपणापासून एक भीती वाटायची कि हि बया सासरी गेल्यावर कसं व्हायचं पण ही सासरी गेल्यावरसुद्धा दादा पुराण चालूच आहे. मी कोल्हापुरात शिकायला बाहेर पडलो तेव्हा आमचं ध्यान पाचवीत होत. दादा येताना खायला हे घेऊन ये, मला बटणं असलेली कंपास बॉक्स पाहिजे, मला मेकअप चा बॉक्स पाहिजे, मला टॉप पाहिजे, दादा गाणं मिक्स करायचं आहे गॅदेरिंग चे,  ये नारे असा काय असे अनेक हट्ट असायचे. तिचा डान्स मी कधी पहिलाच नाही कारण  तिच्या डान्स च्या वेळी मी एकतर फोटो घेण्यात किंवा शूटिंग करण्यात मग्न असायचो. बऱ्याच वेळा तिला कोल्हापुरातून ड्रेस आणताना मैत्रिणींना घेऊन जावे लागायचे. माझीच न्हवे तर माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींची ती लाडकी बहीण होती. टोल संस्कृतीची तर माझी बहिण जनक आहे कारण  मित्र घरी यायचे असतील तर dairy milk चा टोल आधी बहिणीला  द्यावा लागायचा, अजूनही तसच आहे. तीन महिन्यांपूर्वी कोकणात असलेल्या माझा जवळचा मित्र राहुल हिंगे याला मी फोन केला कि राहुल्या मला एक किलो काजू आणि मालवणी मसाला पाठवून दे. त्याने तो मला त्या दिवशी पाठवला नाही. संध्याकाळी फोन केल्यावर म्हणतो की पाऊस खूप होता म्हणून नाही गेलो. मी म्हंटले अरे पूजाला ( आमच्या बहिनाबाईंचं नांव) पाहिजे, तर पठ्ठा दुसऱ्या दिवशी साहेब भिजत जाऊन एस.टी ने मला पाठवून दिले. एवढा सर्वांचा तिच्यावर जीव. पण तिने पण सगळ्यांना एवढाच जीव लावलाय. आज ती माहेरी आली की सगळ्या मित्रांना आणि माझी मामेबहिण श्रेयाला फोन करते. तिला बोलवून घेते आणि मित्रांना फोन करून टोल आंदोलन सुरू. बहिणींचा हट्ट कसा असतो हे तिच्याकडून शिकावे. पण ह्यात एक मजा आहे. तिचा हट्ट पूर्ण करण्यात, तिला चिडवण्यात , तिला रडवण्यात, तिचे कौतुक करण्यात आणि तिच्या मागण्या पूर्ण केल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद बघण्यात. मला तिला समाधानी नाही बघायचं कारण मग हट्ट कोण करणार आणि आम्ही तरी तो पूर्ण कसा करणार, हा पण तिला सुखी बघायचंय. तुम्हा सर्वांची छोटी बहीण अशीच असेल ना. तुम्हाला एखाद्या मुलीचा फोन आल्यावर काय दादा, आ, काय हे, कोण हि , आईला सांगू , मग फोन वरील कोणीच नसताना आपण उगाच घाबरल्यासारखा करायचो. मग ती चॉकलेट मागायची आणि मग आपण हि द्यायचो. पण ह्यात एक वेगळीच गंमत असायची. खूप लिहिता येईल पण अजूनही मोठ्या बहिणीसाठी लिहायचंय. नाहीतर मोठ्या बहिणीला राग यायचा. खरं तर मला मोठी सख्खी बहीण नाही. पण मला मावस बहिणी आणि मामे बहिणी खूप आहेत. माझ्या मोठ्या मावशीच्या मुली माझ्यापेक्षा मोठ्या. पण प्रसाद दादा ( मावशीचा मुलगा) पेक्षा आरती ताई आणि तिट्या ने माझे खूप लाड केले. मला आवडणारे पदार्थ, घरी आणि बाहेरही खायला दिले. मला बरं नसतांना भाऊजींना पाठवून दवाखान्यात न्यायला लावले. पण ह्या सख्या नात्यांच्या पलीकडेही स्नेहल ताई, माई, दीदी मला भेटली. आमचे घरमालकांच्या त्या मुली. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या सर्व. पण स्नेहल ताईचे सासर माणगाव मधेच असल्यामुळे मला नेहमी भेटायची. ती आईची मैत्रीण. त्यामुळे ती घरात नेहमी यायची. मोठ्या बहिणीची माया तिने दिली.  कधी निर्णय चुकायला लागले की सल्ला द्यायची.
काल माझ्या सासरी माझे सासरे त्यांच्या बहिणींबद्दल बोलत होते.अगदी भरभरून.. तिने सावरले. खूप प्रेम दिले.मोठी बहीण अशीच असते. भावांना सावरणारी, भावांना सल्ला देणारी, चुकलात तर ओरडणारी, कान पकडणारी.. भावाला पुढे आणण्यासाठी प्रसंगी ढाल बनणारी आणि बऱ्याच वेळा भावाच्या सर्व इच्छा पूर्ण करता स्वतःची स्वप्न मागे टाकणारी. डोळ्यात येणारी आसावे हळूच पुसताना आपण बघितलेच तर काही नाहीरे, डोळ्यात काहीतरी गेलं बघ असे हसत म्हणणारी. आई वडिलांनंतर आधार आणि सांभाळणारी.. मोठी किंवा छोटी असो पण जीव लावणारी. आम्ही हे नाते आई मामांच्या रुपात बघितले. भाऊ बहिणींचे नाते कसे असावे ते आम्ही त्यांच्याकडून अनुभवत आलो..म्हणूनच मी म्हणतो आई वडीलांनंतर ती.. आपल्या सर्वांची लाडकी तीच लाडकी बहीण...


तुमचाच,
© अमित संजय कुलकर्णी.
      गडहिंग्लज.
      9404968084