Wednesday, December 28, 2016

बाबा..

बाबा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. आज माझ्या बाबांचा वाढदिवस. खरं तर प्रत्येकाचे बाबा हे त्यांचे आयकॉन असतात. जसे माझेही आहेतच. पण मुलाचं आणि वडिलांच पटतही नाही. बऱ्याचदा आई आणि मुलगा, वडील आणि मुलगी ह्यांच पटत असे म्हणतात. आमच्या घरातही अगदी असंच आहे. पण खरं सांगू वडिलांचा मुलांना जो छुपा ( Hidden ) पाठिंबा असतो ना त्याची तुलना जगातील कुठल्याही पाठिंब्याशी करता येत नाही. हा एकच माणूस असा असतो कि जो आपला मुलगा , स्वतःपेक्षाही पुढे जाताना खुश होतो. त्याचा मनमुराद आनंद घेतो. वक्त हा अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन ह्यांचा सिनेमा  (picture) बघताना मला हे पावलोपावली जाणवतही. मुलाच्या शिक्षणानंतरही त्याला नोकरी लागत नसताना हाच बाप त्याच्या मुलाच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. बेटा तू लढ मी आहे पाठीशी असे म्हणताना तो आतून मात्र मुलाला जॉब लागत नाही म्हणून तळमळत असतो.
बऱ्याच जणांना असे बाबा अनुभवायला मिळतात. ज्याप्रमाणे आई मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे एक वडील ही मुलाच्या सर्व ईच्छा, आकांशा ,मुलांचे करिअर पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या सर्व आवडी निवडी पाण्यात घालतात. मुलाच्या प्रत्येक अपयशात साथ देताना डोळ्यातील अश्रू लपवणे हे कसब आहे, आणि मुलाला योग्य वळणावर आणण्यासाठी रुद्रावतार घेऊन मनातल्या मनात रडणे हे सुद्धा कसबच आहे. बाप ह्या दोन्ही गोष्टी सहजरित्या करताना दाखवत असतो आणि म्हणूनच तो बाप असतो.
पण हाच बाबा मुलाच्या यशात विजयाचा उन्माद करतो, जणू काही त्याच्या मुलाने मिळवलेले यश जगातील  पहिल्यांदाच मिळवलेले यश आहे अशा अविर्भवात तो सगळ्यांना सांगत राहतो. त्याच मुलावर असलेलं प्रेम ज्या मुलाला समजलं तो मुलगा धन्य झाला. कारण बऱ्याच मुलांना त्यांच्या वडिलांची किंमत नसते. बाबांची चार चौघात चेष्टा करणे, मित्रांनी एखाद्याच्या वडिलांना जरी एकेरी नावाने जरी हाक तरी त्यात सामील होऊन स्वतः हसणे ह्याचा अर्थ त्यांना बाप समजलाच नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो की जास्त बोलू नकोस तुला बाप आठवायला लागेल. पण ह्या वाक्यातच बाप हि केवढी मोठी व्यक्ती आहे हे कळते आणि बापाचा आधार सुद्धा कळतो
जगातील प्रत्येक वडिलांच महत्त्व अगणित आहे, अनन्यसाधारण आहे. वडिलांच महत्व कळायच असेल तर वडिलांच्या जवळ जाव लागतं.मुलाने वयात आल्यावर वडिलांशी गप्पा आणि संवाद साधला तर मुलाच आणि वडीलांच नातं फुलत जात. दोघेही जवळ येतात. वडील मग त्यांच्या तरूणपणातील गोष्टी सांगतात.खूप रमतात दोघे गप्पात. मुलाला आश्चर्य वाटत राहतं कि अरे आपण करत असलेल्या गोष्टी आपल्या वडिलांनी सुद्धा केलेल्या आहेत ना. मग दोघेही मनमुराद हसतात. ह्या गप्पा चालत असताना मुलगा एकदम भावनाशील होतो. एकदम उठतो आणि बापाला घट्ट मिठी मारतो. कारण खऱ्या अर्थाने त्याला आता त्याचा बाबा समजत चाललेला असतो. मूल आणि वडिलांच नातं अगदी सहज आणि सुंदर आहे.
जसं माझं आणि माझ्या वडिलांच नातं आहे. माझ्या वडिलांनी ते फुलवलंय. त्यांनी योग्य वेळेत योग्य भूमिका बजावल्यात जसं लहानपणी ओरडून, मारून, कधी कष्टाचं महत्त्व सांगून तर कधी पैशाचं महत्व पटवून, योग्य वयात समजून सांगून, गप्पा मारून , अगदी वेगवेगळ्या पद्धतीने. माझ्या प्रत्येक निर्णयात मला त्यांनी पाठींबा दिलाय. मला मदत केलीय. माझ्या पाठीशी आई बाबा दोघेही ढालीसारखे उभे राहिले. आपण खूपदा म्हणतो की चांगले आई व वडील मिळायला भाग्य लागते, पण प्रत्येक आई वडील हे चांगलेच असतात. चांगला मुलगा किंवा मुलगी होणे जास्त चांगले आणि महत्वाचे असते. त्यांच्या सहवासात तुमचे व्यक्तिमत्व घडेल, फुलेल आणि मग जगातील सुंदर नात्यांचा अनुभव आपल्याला घेता येईल. मी या सुंदर नात्यांचा अनुभव घेत आलोय याहून माझे नशीब ते कोणते. म्हणूनच मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी आई वडिलांपासून दूर राहून जॉब करण्यापेक्षा मला माझ्या आई वडिलांबरोबर राहायला मिळते हे माझे भाग्यच. Love you आई बाबा..

©अमित संजय कुलकर्णी
    गडहिंग्लज.

No comments:

Post a Comment